Aasusali Mati Pikavaya / आसुसली माती पिकवाया
आसुसली माती, पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा!
पाऊस पाड !
मेघांच्या राजाला जाऊन सांग
ढगांनी काजळु दे डोंगरांची रांग
डोंगराच्या तळी, करपली काळी
हराळीची मुळी पुन्हा घेऊ दे वाढ गा!
चारा नाही गाऊल्यांना, दूध नाही वासरां
धाराविना पेरा नाही, कोण आम्हा आसरा?
नदी नाला आटे, काळजात तुटे
वृंदावनी वठे दारी तुळशीचे झाड ग !
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा!
धरणीच्या पोटात साठू दे ओल
रुजू दे बियाण गवतात खोल
ओल्यावर उन्हं, निवतील मनं
कुबेराचे धन मग मोत्याला मोड गा!
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: सुधीर फडके, आशा भोसले
चित्रपट: कुबेराचं धन
गीत प्रकार: चित्रगीत