Mukkamala Rhava Pavhana / मुक्कामाला र्हावा पाव्हणं
माघ मास पडली थंडी, पती माझे गेले गावा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
मजल फार पडली तुम्हा, जरा ओसरीला टेका
गरम तापवीते हंडा, हातपाय थोडे शेका
लिंबोणीला बांधा घोडा, चारा-पाणी त्याला दावा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
दूर वावराची वस्ती, गाव लांब तिकडं राही
तिन्हीसांज टळुनी गेली, येत-जात कुणी नाही
चार घास माझ्या हातचे ऊन ऊन तुम्ही जेवा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
सकाळीच न्हाले होते अजून केस ओले ओले
आवतन्यावाचून तुमचे पाय कसे दारी आले
उर्स बघायासी गेल्या सासुबाई-नणंदा-जावा
मुक्कामाला र्हावा, पाव्हणं मुक्कामाला र्हावा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: झाला महार पंढरीनाथ
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत