Ujadlyavari Sakhya Nighun / उजाडल्यावरी सख्या निघून
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ?
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे
अजून कुंतलात या तुझा न जीव कुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे
गीत: सुरेश भट
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत