Aparna Tap Karite Kanani / अपर्णा तप करिते काननी
भस्मविलेपित रुप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी ॥ धृ.॥
वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी
अपर्णा तप करिते काननी ॥१॥
त्रिशूल डमरु पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी
अपर्णा तप करिते काननी ॥२॥
कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी
अपर्णा तप करिते काननी ॥३॥
गीत: शान्ता शेळके
संगीत: आनंदघन
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: तांबडी माती
गीत प्रकार: चित्रगीत