Asata Sameep Doghe / असता समीप दोघे
असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे
शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे !
अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती
होता क्षणैक दूर वेडी मनात भीती
दिनरात चिंतनाचे, अनिवार कौतुकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा
ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
गीत: शान्ता शेळके
संगीत: एन्. दत्ता
स्वर: महेंद्र कपूर, आशा भोसले
चित्रपट: एक दोन तीन
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत