Gori Bahuli Kuthun Aali / गोरी बाहुली कुठुन आली
गोरी बाहुली कुठुन आली
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली
झगा ना साडी तश्शी नागडी
चड्डीदेखील कशी हिने नाही घातली
उताणी पडे तशीच रडे
डोळ्यामधे हिच्या ओल्या निळाचे खडे
पुशी ही धीट, गालीचे तीट
कुठे बाई ठेवावी ही जपुनी नीट
कोण्या दुकानी होती ही राणी
पेटीविना तरी हिला आणली कोणी
छान रेखिले नाक डोळुले
लावयाचे केस हिला पार राहिले
आई ग आई, मला ही देई
बदल्यात माझी सारी खेळणी घेई
हत्ती नी घोडे कुत्री माकडे
सिनेमाची पेटीसुद्धा देईन गडे
पोर लाघवी मला ही हवी
हवीतर बाबांकडे माग तू नवी
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: आशा भोसले
चित्रपट: बोलकी बाहुली
गीत प्रकार: चित्रगीत