Guljar Gulachadi Natun Mi/ गुलजार गुलछडी नटून मी
गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग, तंग पैठणी
चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा
डाळिंब फुटे ओठांत गालांमध्ये लाज
मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज
छुम छुम बोले चाळ, नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा
बेभान नाचते रूपगुणाची राणी
ऊर होतो खालीवर बाई पारव्यावाणी
अडवुनी जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: आशा भोसले
चित्रपट: धन्य ते संताजी धनाजी
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत