Jivan Gane Gatach Rahave / जीवनगाणे गातच रहावे
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली?
सान बाहुली ही इवली, लटकी लटकी का रुसली?
रुसली रुसली खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !
गीत: शान्ता शेळके
संगीत: रामलक्ष्मण
स्वर: महेंद्र कपूर, उषा मंगेशकर
चित्रपट: आपली माणसं (१९७९)
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत