Kunitari Sanga Ho Sajana / कुणीतरी सांगा हो सजणा
रातिची झोप मज येइ ना
की दिसं जाइना
जा जा जा ना
कुणितरी सांगा हो सजणा !
लागली श्रावणझड दारी
जिवाला वाटे जडभारी
अशी मी राघुविण मैना
की झाली दैना
जा जा जा
कुणितरी सांगा हो सजणा !
एकली झुरते मी बाई
सुकली ग पाण्याविण जाई
वाटते पाहु मनमोहना
की मन राहिना
जा जा जा
कुणितरी सांगा हो सजणा !
कठिण किति काळिज पुरुषाचे
दिवस मज जाती वर्षाचे
जाउनी झाला एक महिना
की सखा येइना
जा जा जा
कुणितरी सांगा हो सजणा !
गीत: शान्ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: पवनाकाठचा धोंडी
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत