Maj Aavadale He Gaav / मज आवडले हे गाव
मज आवडले हे गाव !
नदी वाहती घाट उतरते
तीरावरती गोधन चरते
हिरवी मळई जळा चुंबिते
इकडून तिकडे, तिकडून इकडे खेपा करिते नाव
मज आवडले हे गाव !
चहु बाजूला निळसर डोंगर
मधे थिटुकले खेडे सुंदर
निंब, बाभळी, अंबा, उंबर
हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी करिती शीतळ छांव
मज आवडले हे गाव !
घरे ठेंगणी, वळत्या वाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
राऊळ शिखरी उंच बावटा
भगव्या रंगे जगास सांगे वंश कुळाचे नाव
मज आवडले हे गाव !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: गाठ पडली ठका ठका
गीत प्रकार: चित्रगीत