Mi Hi Ashi Bholi Kashi Ga / मीही अशी भोळी कशी ग
मीही अशी भोळी कशी ग?
भोळी खुळी !
मी लाजले
जे मना वाटले
ते राहिले माझ्याचपाशी !
मी जाणिले ना मनी काय आले?
एका कळीचे कसे फूल झाले?
अंग अंग माझे नवे रूप ल्याले
डोळ्यांमध्ये चांदणे धुंद ओले
आले कुठे मी स्वप्नदेशी?
ओठांत आले मुके गुज बाई
मला बावरीला सुचेनाच काही
भरे कंप देही झुके पापणीही
शब्दांविना अंतरी सूर गाई
ते गुंजते आता स्वतःशी
गीत: शान्ता शेळके
संगीत: हेमंत भोसले
स्वर: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत