Oon Aso Va Aso Savali / ऊन असो वा असो सावली
ऊन असो वा असो सावली , काटे अथवा फुले असू दे
या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवुनी मला हसू दे
कधी निराशा खिन्न दाटली कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती निळेनिळे चांदणे भेटले
गुज मनातील सांगत तुजला चांदण्यात या मला बसू दे
कळी एकदा रुसून म्हणाली , ” नाही मी भूलणारच नाही ,
किती जरी केलीस आर्जवे तरीही मी फुलणारच नाही !”
फुलून आली कधी न कळले , तशी लाजरी पुन्हा रुसू दे
सांजघनाचा सोन केवडा भिजवित आली ही हळवी सर
तुझ्या नि माझ्या भवतीचे जग स्वप्नापरी हे झाले धूसर
तुला बिलगुनी चिंब भिजू दे , असे अनावर सुख बरसू दे
गीत: मंगेश पाडगांवकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: अरुण दाते, आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत, युगुलगीत