Patha Shiva Ho Patha Shiva / पाठ शिवा हो पाठ शिवा
पाठ शिवा हो, पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा
बन केळीचे हरित सापळे, लपायास मज असे मोकळे
प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा?
नूपुर विरहित जरि तव पाऊल, अचुक मला पण लागे चाहूल
कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा
उमटु न देईन साद पाउली, सरकन जाइन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद हा रंभांचा उभा थवा
सावली होशिल, परि कशाची?
तुझ्या रूपाची, तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे? दोन जिवांचा जडे दुवा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: लक्ष्मण बेरळेकर
स्वर: सुधीर फडके, आशा भोसले
चित्रपट: वरदक्षिणा
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत