Sawal Jawab Song / सवाल जवाब
सवाल- 1 ( आईचा )
नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असेहे
ठाऊक अवघ्या जगताला ||
अगं सांग तु ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
अन कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं ||
जवाब -1 ( लेकीचा )
अहो नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
सांब शिवाची अर्धांगी तीज
माय पार्वती म्हणती गं ||
अहो अंग मलातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती
अन त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं ||
सवाल -2 ( लेकीचा )
सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधाराचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं ||
देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिर्तीचा
अंधाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा ||
जवाब -2 ( आईचा )
सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंघारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची ||
युगायुगांचे सत्य असे, ही
सखी सख्या विन नसते गं
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं ||
सवाल ( वडिलांचा ) & ( आईचा )
अग आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहुन मउसुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं त्याचं अद्भुत गं ||
डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुना ||
देवदानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं ||
जवाब ( लेकीचा )
किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं ||
लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||
जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे ||
गीत : सवाल जवाब
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : मधुरा दातार, प्रियांका बर्वे, विश्वजीत बोरवणकर
संगीत लेबल: Everest Marathi