Thandichi Jhop Mala / थंडीची झोप मला
माघाची रात
चांदणं त्यात
कुशी बदलून काही भागेना
थंडीची झोप मला लागेना
डावा डोळा
लवतो खुळा
नशीब काही बाई जागेना
सखा लढाईला गेला
गेला तो अजून नाही आला
घरी नार तरणी लागली झुरणीला
तपास केला
वाया गेला
कुणीच काही मला सांगेना
दिवसभर मी तळमळते
रात्री समईसंगे जळते
बायकांचं दु:ख बायकांनाच कळते
फुरफुर करी
समईपरी
घोड्याची टाप काही वाजेना
आता झाली ग पहाट
किती न्याहाळू मी वाट?
आली जांभई, बाई माझी अवघडली पाठ
पुन्हा सुरू तो रहाट
माझे डोळे, त्याची वाट
नीज नाही, सूज आली माझ्या डोळ्यांना दाट
उचकी येते
सई होते
शकुनाचं फळ मला लाभेना
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: नरवीर तानाजी
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत