Ushakkal Hota Hota / उषःकाल होता होता
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने- ज्यांना प्रेतही न वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
गीत: सुरेश भट
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: रवींद्र साठे, अरुण दाते, आशा भोसले
चित्रपट: सिंहासन
गीत प्रकार: स्फूर्ती गीत, चित्रगीत