Yenar Nath Aata / येणार नाथ आता
ओठांत हाक येते सानंद गीत गाता
येणार नाथ आता !
मी पाऊले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला हो स्पर्शभास हाता !
आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले एका खुळ्या मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा !
आता नका क्षणांनो दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरून चालू
ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: सुवासिनी
गीत प्रकार: चित्रगीत