Giridhar Var Varila / गिरिधर वर वरिला
अर्ध्या रात्री यमुना पात्री कर त्याने धरिला
गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला
रंगरंग नीत मजसी खेळतो, रंगनाथ माझा
मी मेवाडी, राजदुलारी, मथुरेचा तो राजा
जगावेगळी माझी सत्ता, ध्यास न दुसरा उरला
गिरीधर वर वरिला
फेर धरून मी नाच नाचले, न्याहळते शामा
मीच राधिका, मीच रुक्मिणी, मीच तयाची भामा
मुखी नाचते नाम तयाचे, ताल पैंजणी उरला
गिरीधर वर वरिला
कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी
भिजे ओढणी, भिजे कंचुकी, भिजती अंगी सारी
आनंदाचा पडतो पाऊस मेघ सावळा सरला
गिरीधर वर वरिला
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: आशा भोसले
चित्रपट: घरगंगेच्या काठी
गीत प्रकार: चित्रगीत