Chandra Aanakhi Preeti / चंद्र आणखी प्रीती
चंद्र पाहता सइ प्रीतीची तरुण मना का येते?
चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते?
अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग
अन् प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग
अग प्रीतनगरची प्रजा तयाच्या मुजर्यासाठी येते
अन् प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रीतिची घेते
तोंडावरती जडे काळीमा, झिजते ज्याची कला कला
तो मदनाचा मंत्री कैसा समजुनी सांगा तुम्ही मला?
गुरुपत्नीशी पाप करी हा, शाप बाधला याते
चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते?
अग चंद्र उगवता समुद्र उसळे, चढती डोंगरलाटा
अन् तो देखावा प्रीतरसाचा शाहिर म्हणती मोठा
अग नभ-धरणीचे अंतर त्यांच्या प्रीतीने तुटते
अन् चंद्र आणखी प्रीती यांचे तूच ठरव गे नाते
लाटा उठती सागरात ज्या, त्या तर त्याच्या लेकी
चंद्र-लहरिंची प्रीत जोडिती त्यांची फिरली डोकी !
सख्खि बहिण अन् सख्ख्या भावाची प्रीत कधी का होते?
चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते?
अग चंद्र कसा ग होईल भाऊ उगाच सागरलाटांचा?
अन् आधारासी दाव पुरावा, नको धिटावा ओठांचा
देवदानवी समुद्रमंथन पुराणांतरी केले ना
मंथनात त्या रत्न चंद्रमा उसळुन वरती आले ना
जन्म पावला सागरपोटी तो तर त्याचा बेटा
त्याच सागरी जन्मतात ना निळ्या उसळत्या लाटा
अहो बहिण-भाऊ याहून कुठले चंद्र-लहरिंचे नाते?
चंद्र पाहता सइ प्रीतीची तरुण मना का येते?
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: विठ्ठल शिंदे, आशा भोसले
चित्रपट: सांगत्ये ऐका
गीत प्रकार: चित्रगीत