Dhakka Lagala Ga / धक्का लागला ग
धक्का लागला ग मघाशी कुणाचा
तोल सावरेना बाई अजुनी मनाचा !
उगा हासला तो, उगा लाजले मी
करी वीज त्याच्या, उरी भाजले मी
ठसा राहिला ग मुक्या भाषणाचा !
पुढे चालले मी, फिरे पाय मागे
कशाची कळेना अशी ओढ लागे
सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा !
झरू लागल्या ग ढगांतून धारा
मनीच्या विजेचा मनी कोंडमारा
ठिकाणा तरी ग कुठे साजणाचा?
भिजे पावसाने जरी अंग सारे
उफाळून येती उरीचे निखारे
शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: जगाच्या पाठीवर
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत