Mauli Devahunhi Thor / माउली देवाहूनही थोर
इथेच काशी इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर
माया-ममता उदंड देते, नाही जीवाला घोर
माउली देवाहूनही थोर
विश्व निर्मिले त्या देवाला आईची ना माया
आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया
वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहतो पोर
माउली देवाहूनही थोर
नऊ महिने अन् नऊ दिवसाचे अतूट प्रेमळ नाते
प्रसववेदना हसत झेलते, जन्म लेकराचे देते
तळहाताचा करी पाळणाममतेचा हा दोर
माउली देवाहूनही थोर
चिमण्या बाळा घास भरवते राहून उपास पोटी
जीव लावते, जीवही देते, माय-माउली मोठी
पदर पांघरून बाळ खेळते मांडीवर बिनघोर
माउली देवाहूनही थोर
गीत: मा. दा. देवकाते
संगीत: विश्वनाथ मोरे
स्वर: सुरेश वाडकर
चित्रपट: दैवत
गीत प्रकार: चित्रगीत, भावगीत